उद्याचा मी म्हणून / दिनेश हंचाटे

उद्याचा उगवणारा दिवस माझा आहे म्हणून
जगत असतो, पण उद्याचा दिवस
आज म्हणून येतो, तो कालचा झालेला असतो.
उद्याचा जन्मणारा बाळ आहे म्हणून
तरसत असतो, पण उद्याचा माझा बाळ
तरुण म्हणून होतो, तो दुसर्‍याचा झालेला असतो.
उद्याची कोमललेली सकाळ आहे म्हणून
तरळत असतो, पण उद्याची सकाळ
संध्याकाळ म्हणून येते, आणि ती चंद्राची झालेली असते.
उद्याचा मुलगा माझा आहे म्हणून
वेडावून गेलेला असतो, पण उद्याचा मुलगा
जावई म्हणून जातो, तो सासरचा झालेला असतो.
उद्याची सोनकळी माझी आहे म्हणून
सद्‌गदीत असतो, पण उद्याची सोनकळी
सून म्हणून जाते, ती दुसर्‍या घराची झालेली असते.
उद्याचा प्रत्येक क्षण माझा आहे म्हणून
कंठत असतो, पण उद्याचा क्षण
भूतकाळ म्हणून जातो, तो काळाचा झालेला असतो.
मी जेव्हा आज मात्र माझा आहे म्हणून
स्वतःवर मी पणा गाजवतो, पण आजचा मी
हरवलेला म्हणून येतो, तो अहंकारात विलीन झालेला असतो.
उद्याचं वाटणारं तारुण्य आहे म्हणून
जोशात असतो, पण उद्याचं तारुण्य
वार्धक्य म्हणून येतं, आणि तो उद्याचा मी म्हणूनच असतो.